• Admin

भारतवर्ष आणि योग

Updated: Apr 11
मी शाळेत असताना माझ्या देशाची म्हणजेच भारतवर्षाची संकल्पना अगदी सोपी होती. उत्तरं यत्समुद्रस्यः हिमाद्रेश्श्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतन् नामः भारती यत्र संतः।

समुद्राच्या उत्तरेकडील आणि हिमाच्छादित पर्वतांच्या दक्षिणेस असलेल्या देशाला म्हणतात भारतम; तेथे भरताचे वंशज आहेत. ” हिमालय, सिंधू सागर, हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर यांनी संरक्षिलेली ही जमीन.


अशी जमीन जिथे सर्व हंगामात भरपूर पीक आणि देशभर सर्वदूर पसरलेल्या अनेक नद्या. त्या मुळे संस्कृती वाढण्याची आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रयोग करण्याची संधी आपणास मिळाली. जरी आपण रोमन, पर्शियन, ग्रीक आणि अरब साम्राज्यांसोबत व्यापार करीत होतो प्राचीन काळात मध्य पूर्व, मध्य आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील हल्लेखोरांचा फारसा संबंध आला नाही. त्या अलिप्तपणामुळे आपल्याला जीवनाच्या सर्व बाबतीत अग्रेसर राहण्याची संधी मिळाली. हे सर्व याकरिता कि योग हा भारतातच का विकसित झाला ? याविषयी कुतूहल देखील होते.
मंदिर परिसरातील आनंदी मुले


आमच्याकडे भारत देशाच्या योगासंदर्भात देशाच्या विविध भागात प्रवास करण्यास सुरवात होईपर्यंत एक मजबूत दुवा म्हणावी अशी तुटपुंजी माहिती होती. हा आमच्या शालेय अभ्यासक्रमाचा कधीच भाग नसल्यामुळे त्याबद्दल आपल्याला तपशीलवार माहिती नव्हती. योग साधनाचा अभ्यास करण्याच्या वास्तविक निर्णयाआधी आम्ही आपल्या देशाच्या प्रवासात असे अनेक अद्भुत अनुभव घेतले ज्याने एक नवीन दृष्टीकोन तयार झाला. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित सौंदर्य यापलीकडे पाहायला सुरवात झाली. बालपणातच आम्ही नेहमीच कुठल्याही गावाकडच्या मुलांसारखे निसर्ग आणि प्राण्यांकडे आकर्षित झालो होतो. भूतकाळातील लोक, त्यांची श्रद्धा, कला, कलाकुसर हे पाहत असताना एक लक्षात आले कि तल्लीनता म्हणजे काय असते . निसर्गानुरूप कलाकृती आणि त्यातून उत्पन्न होणारी पवित्र भावना. कुठल्याही पुरातन मंदिरात, गुहेत, पुष्करणीवर गेल्यास नेहमी प्रसन्न का वाटते ? जरी आज काहींना भग्नावस्था प्राप्त झाली तरीही तिकडे गेल्यावर मन शांत का होते ? जेव्हा निर्माणकर्ता कलेच्या उच्च स्थर प्राप्त करतो त्याचवेळेस दैवी ऊर्जेचा त्याला स्पर्श होतो. तुलनाच जर करायची असेल तर आजची कला मन अस्वस्थ का करते ? समाजच अस्वस्थ आहे मग कलाकार त्यापासून कसा अलिप्त राहू शकेल ?

असो .


क्षेत्र महाबळेश्वर येथील प्राचीन शिव मंदिरात ध्यान करताना रुद्रप्रताप साधारणत: योगी म्हणजे एक गंभीर दिसणारा माणूस ध्यानाच्या आसनात बसलेला. परंतु नीट पाहिले तर स्वत: ला मोक्षप्राप्तीसाठी तयार करण्यासाठी प्राणशक्ती आणि मनाचे नियंत्रित करणारा एक साधक. पतंजलीच्या भाषेत सांगायचे तर योग: चित्त-वृत्ती निरोधः ।  


योग संपूर्ण मनाची स्थिरता आणि शांतता असते; जेणेकरून एखाद्याला जीवन आहे तसे अनुभवता येते. निश्चितच याविषयावर चर्चा करणे हा एक गंभीर विषय आहे आणि त्यात प्रभुत्व मिळवण्यासाठी गुरूचा आशीर्वाद, सेवा आणि साधना आवश्यक आहे. आपल्यातील काहीजण राजयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, हठयोग, इत्यादींशी परिचित असतील किंवा ऐकले असेल. गुरु-शिष्य या परंपरेने हजारो वर्षांपासून ते आपल्या संस्कृतीत आणि आपसूकपणे रक्तात भिनलय. एखादा मुमुक्षु ( ज्ञानाची तीव्र इच्छा असलेला ) शिष्य आणि आत्मज्ञान देण्याची शक्ती असलेले गुरुवर्य यांच्या परंपरेने ठिकठिकाणी हि भूमी पवित्र झाली .


हंपी येथील विरुपाक्ष मंदिर


तुम्ही म्हणाल देशाटनाचा ( फिरणे ) आणि योगाचा संबंध काय ? मला देखील हा प्रश्न पडला होता. योग हा फक्त धार्मिक किंवा व्यायामाचा प्रकार वाटायचा. पण ज्या ज्या वेळेस कबीराचा एखादा दोहा ऐकलं की मन भारावून जायचे, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग आणि ओव्या अजूनही मनाचा ठाव घेतात. बेलूर चे मंदिर पाहताना तासभर फिरले तरीही कमीच वाटायचे, किन्नौर कैलासाचे दर्शन पाहत दोन तास एका जागेवर निघून कसे गेले हेच कळले नाही . गंगा मैयाच्या काठावर पहाटे बसले असताना डोळ्यातून अश्रू का वाहू लागले ? लान्गझाचा बुद्ध आणि स्पिती नदीच्या खोऱ्यात स्वतःच्या श्वास आणि वारा यांच्या अस्तित्वाची जाणीव तीव्र का झाली ? असे अनेको प्रश्न पडायला लागले . भावनेची अनुभूती एवढी तीव्र काही ठिकाणीच का होते ? काही गाणी शेकडो वर्ष लोटली तरीही समाजमनात अजरामर का राहतात ? मंदिरात गेल्यावर शांत आणि प्रसन्न का वाटते ? ओंकाराचा जप मनावरील मळभ का दूर करतो ?


त्रिची ( तिरुचिरापल्ली ) येथील श्रीरंगम मंदिरातील शिल्प


ह्या सर्वांचे उत्तर म्हणजे योग. हा आपल्या पूर्वजांनी आपल्यास दिलेली जीवनसंजीवनी होय. प्रत्येक क्षेत्रास जेव्हा एखाद्या योगी व्यक्तीचा स्पर्श झाला त्या सर्व क्षेत्रात आपण उत्तुंगता गाठली. त्यामुळेच तुमच्या लक्षात येईल कि आज इतक्या अडचणी असल्या तरीही परदेशी लोक भारत भ्रमंती करायला का येतात ? आम्ही आमच्या प्रवासाद्वारे त्याचे रहस्य उलगडण्यासाठी त्या मार्गावर चालत आहोत. आपल्या भारतवर्षामध्ये योग आणि जीवनपद्धती कशी गुंफलेली आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता.चितौडगड येथील प्राचीन कीर्ती स्तंभ

  कला आणि योग दर्शन


जगातील कुठल्याही संस्कृतीची ओळख करावयाची असेल तर आपण पहिल्यांदा जातो ती मानवनिर्मित सौंदर्य स्थळे पाहायला. त्यावर केलेल्या कामावरून आपण पूर्वजांजी विचारसरणी, राहणीमान, कलाक्षेत्रातील उंची समजावून घेऊ शकतो. आणि हे पाहताना साहजिकच आपले मन वर्तमानातील कलाकृतींशी त्याची तुलना करते. मग जर आपल्याला भारताला समजावून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्या घराजवळ असलेले स्थान म्हणजे एखादे पंचक्रोशीतील पुरातन मंदिर किंवा गुंफा. एकवेळ इतर सर्व कला काळाच्या ओघात हरवून जाण्याचा धोका असतो. परंतु दगडात निर्मिलेले शिल्प हजार वर्ष आणि त्याही पलीकडे आपले अस्तित्व दाखवून देते. पुरातन काळात जर देवाची प्रतिमा कशी असेल हे आपल्याला दाखवले ते शिल्पकाराने! सहज एक विचार करा त्या शिल्पकाराला देवाचे किंवा दैवी शक्तीचे दर्शन कसे घडले असेल? स्वप्नात , एखाद्या योग्याच्या चेहऱ्यात कि ध्यानात जाऊन? का आपल्याला गौतमाचा चेहरा पहिला कि चेहऱ्यावरचा तणाव सैल होतो ? कृष्ण लीला पाहून एखाद्या माईच्या मनात वात्सल्य भाव जागा होतो ? मंदिरावरील दर्पण सुंदरी पहिल्यावर तिच्यात प्रेमिका दिसते. आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा आणि वर्षानुवर्षांची साधना त्या शिल्पातून प्रकट झाली. इतकी कि ते दगडही बोलू लागले. 


अजिंठ्यातील बुद्धमूर्ती

प्राचीन काळात बहुतेक ही कला निसर्गाशी आणि परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या सामग्रीच्या अनुषंगाने तयार केली गेली होती ज्यामुळे ते वातावरण अनुकूल बनले. परंतु सर्वसामान्यांसाठी तयार केलेल्या जागांना देखील एक कारण होते विशेषतः लेणी आणि मंदिरे. शिल्प योगी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिल्पकार आणि चित्रकारांनी शेकडो आणि हजारो मंदिरे बांधली. हे सर्व वेगवेगळ्या समाजातील होते. कदाचित ते वेद किंवा उपनिषदे वाचत नसतील. परंतु त्यांच्या आयुष्यात अध्यात्म, योग आणि धर्म यांचा स्पर्श नक्कीच झाला असेल. कारण भारतीय संस्कृती काय म्हंटल्यावर पहिल्यांदा नजरेसमोर येते ती मंदिरे आणि त्यावरील शिल्पकला. कला आणि अध्यात्म याचा संगम जर कुणी घडविला असेल तर या शिल्पयोगी व्यक्तिमत्वांनी. आता त्यांचे कार्य संपूर्ण मानवतेद्वारे साजरे केले जाते.कल्पना करा राजाश्रय असताना मंदिरांचे सौंदर्य कसे झळाळत असेल !


राणी नु वाव ( बारव ) येथील शिल्प


 वेगवेगळ्या राज्यात अनेक मंदिरांना भेट देण्याच्या कालावधीतमनामध्ये अनेक प्रश्न येऊ लागले की दरवाजा पूर्वेकडे का आहे? दररोज सूर्योदय पहायला त्यांना बरोबर हीच जागा कशी काय मिळाली ? उन्हाळ्यातसुद्धा मंदिराच्या आतून थंड हवा कशी वाहते ? हा कलाकार महादेवाचे तांडव, बुद्धांचे अर्धोन्मीलित नेत्र, विष्णूचे विविध अवतार आणि साधूंचे विविध योग आसन कसे जाणतो ? योगाचा, संस्कृतीचा संपूर्ण अभ्यास असल्याखेरीज अशी निर्मित निव्वळ अशक्यच. आपल्या प्राचीन समाजाचा आणि योगिक परंपरेचा अजरामर आरसा जगाला दाखविणारे लोक हे देखील योगीच म्हणावे. अजिंठा, वेरूळ, मोढेरा, खिद्रापूर, बदामी, हंपी, बेलूर, रामेश्वरम, सरहन महाकाली मंदिर आणि इतर बरीच मंदिरे आणि लेण्या या ठिकाणी भेट दिल्याने कला, जीवनाचे विविध अंगे, योग आणि धर्म यांचा संबंध लागू लागला. लोणारचा सरोवरातील मंदिरांमधील शिल्पकला आणि खेचून घेणारी ऊर्जा ही अनुभवण्याची गोष्ट आहे . जी यापूर्वी आम्ही कधीही अनुभवली नाही. तंजावर, तिरुवनमलाई, कांचीपुरम आणि मीनाक्षी अम्मान यांचे इतके मोठे मंदिर इतर कोठेही नाही . शेकडो वर्षांची अनेक शिल्पयोग्यांची तपश्चर्येचे फळ म्हणजे हि सिद्ध ठिकाणे . सामान्य वास्तूपेक्षा अति उंच आणि सौंदर्यात उजवे असलेली हि मंदिरे आजही ऊर्जेचा अखंड स्रोत आहेत. तिरुंवेल्लीच्या नेलियाप्पार मंदिराचे आणि हंपीच्या विठ्ठल मंदिरांतील नादमय खांब यांनी स्थापत्यकलेच्या उंचीवर विश्वास भक्कम केला. तर गुजरातमधील राणी नु वाव ( बारव ) पाहिल्यावर एक विहीर इतकी सुंदर असू शकते हे दाखविले. ठरविले तर आयुष्याच्या प्रत्येक आयमावर कलेचा ठसा उमटवीत येतो . कलेद्वारे सर्व सुख भोगून योगदेखील साधता येतो याचे शिक्षण सर्वसाधारण समाजाला देण्याचे कार्य जर केले असेल तर ते या शिल्पकारांनी .


दाक्षिणात्य शैलीतील गोपुरंम


जीवन, नृत्य, उत्सव, युद्ध, खेळ, वन्यजीव या सर्व गोष्टी आपल्या देशातील शेकडो आणि हजारो खेड्यांमध्ये पसरलेल्या शिल्पीयोगींनी चित्रित केल्या आहेत किंवा त्यांचे नक्षीकाम केलेले आहेत. ठराविक वेळी प्रकाश कोठे पडणे आवश्यक आहे किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते गाभार्यापर्यंत आवाजाची तीव्रता कितपत असावी हे सर्व कसे आखले असेल? तेदेखील थोडीही चूक न होता दगडावर. आणि यासर्व कार्यात कोठेही प्रदूषण नाही. आम्हाला दा विंची किंवा मायकेल अँजेलोच्या कलाकृतींबद्दल आश्चर्य वाटते. परंतु आमच्याकडे लाखो कलाकार होते ज्यांनी आम्हाला जीवनाची सर्वोत्कृष्ट पैलू अतिशय उत्कटपणे दर्शविले. खरा योगी हा आयुष्याला समरसून सामोरे जातो. . परंतु जसा कमळाच्या पानावरील पाण्याचा थेंब असतो तसा . त्याच्यावर असूनही अस्पर्श आणि निर्मोही. आयुष्याचे सर्व सोहोळे साकारापासून ते निराकारापर्यंत नेण्याचे आणि समाजमनाला शिक्षित करण्याचे कार्य कोणी केले असेल तर या अनामिक शिल्पकारांनी. आणि त्यांचे कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी देणगी देण्याऱ्या राजे आणि व्यापाऱ्यांनी आपल्या देशाची आणि पर्यायी सर्व जगाची सेवाच केली आहे.


हरिश्चन्द्रेश्वर मंदिर

लिहिण्यासारखे खूप आहे. परंतु हा विषय अनुभवण्याचा जास्त आहे. फिरत फिरत तुमची उत्सुकता नक्कीच चाळवली जाईल. मग नवीन पुस्तके वाचणे, शिल्पकला, भारतीय मंदिरे, आणि योग याविषयावर तुम्ही स्वतः नक्कीच माहिती शोधाल. या लेखाचा उद्देश तुम्हाला फिरण्यास आणि शोध घेण्यासाठी प्रेरित करणे हाच आहे. प्रत्येक पिढी हि आपल्या ज्ञानात भर घालीत असते . पण हे करताना आपली पाळेमुळे किती खोलवर आहेत हे कळल्यावर फिरण्याची मजा औरच. पुढच्या भागात पाहूया भारतवर्षातील कला, संगीत आणि योग यांचा संगम .खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरभाग पहिला समाप्त ...

114 views
  • YouTube Social  Icon
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Flickr Social Icon
  • Instagram Social Icon

© Raginee Yogesh Kardile