• Admin

महेश्वर - मा नर्मदा आणि महाराणी अहिल्याबाई 

Updated: Apr 6


मेरा वचनही हैं मेरा शासन असे ताठ मानेने सांगणारी नऊवारी साडी मधली बाहुबलीमधील राजमाता तुम्हाला आठवत असेल. 

तिच्या राजधानीचे नाव महिष्मती होते. ज्याची घोषणा होती महिष्मती साम्राज्यम , स्माकं अजेयम ।

अतिशय भव्य दिव्य हा असा चित्रपट पाहून नक्कीच तुम्हाला अभिमान वाटलं असेल. जर मी तुम्हाला सांगितले कि अगदी अशीच एक महाराणी होती कि जिला सर्व भारतवर्षात तिच्या दानशूरता आणि न्यायप्रियेतेबद्दल ओळखले जात होते. तिच्या राजधानीचे नावदेखील महिष्मती होते जे नंतर महेश्वर झाले. आणि याही पुढची माहिती की ती नगर जिल्ह्यातील चोंडी गावचे माणकोजी शिंदे पाटलांची मुलगी आणि रणधुरंधर मल्हारराव होळकरांची (इंदोर संस्थान) सून होती. अविश्वसनीय वाटते ना ! पण आपल्या महाराष्ट्रातील एक मुलगी अखंड भारतवर्षात आणि विशेषतः मध्य प्रदेशात तिच्या दैदिप्यमान कामगिरीने आजही जनमानसात वंदनीय आहे. त्या म्हणजे पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर. घाटावरील मंदिराची कमान


 शाळेच्या इतिहास भूगोलात जास्त काही माहिती नसल्याकारणाने आपण तितकेसे तिकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा थोडे फिरण्यास सुरवात होते , चार पुस्तके वाचतो तेव्हा आपले धागे कोठे कोठे दूरवर गुंफले आहेत ते लक्षात येते. 

एकावेळेस अनुल्लेखाने व्यक्तिमत्व झाकोळून टाकता येते . परंतु त्या व्यक्तीच्या कार्याची साक्ष तिने उभारलेल्या कार्यातून, जनमानसातील गोष्टींतून, मंदिरे , लेण्या , कलाकृती आणि वसविल्या बाजारपेठ, शहरे यावरून कधीना कधी ध्यानात येते. एकवेळ पुस्तके नष्ट होतील , छायाचित्रे , चित्रे नष्ट होतील . परंतु दगडात उभारलेले शिल्प आणि लोककथा नष्ट होत नाहीत. शेकडो, हजारो वर्ष त्या आसमंतात आणि माणसाच्या मनामनात राहतात. असेच काही आम्हाला जेव्हा इंदोर, ओंकारेश्वर आणि महेश्वरला गेलो तेव्हा लक्षात आले. 


घाटावरील रात्रीचा एक क्षण 


महेश्वर हे ३ गोष्टींकरिता जगप्रसिद्ध आहे  पहिले म्हणजे तिथला अविस्मरणीय नर्मदातटावरचा घाट, माहेश्वरी साडी आणि पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर.  त्या संसारमोहातून विरक्त, कर्तव्य दक्ष, उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ , युद्धकला निपुण आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व होत्या. भारतीय संस्कृती टिकण्यासाठी येथील मंदिरे, किल्ले, घाट हे टिकले पाहिजे. येणाऱ्या काळात लोकांना ते प्रेरणास्थान ठरेल याचा त्यांना निश्चितच अंदाज होता.राजधर्माचे पालन करता करता भारतभर जवळपास चाळीस मंदिरे, घाट, छत्र्या यांना देणग्या त्यांनी दिले. बाहेरून कलाकार, व्यापारी आणून त्यांना येथे वसविले. मुघलांनी जी तोडफोड भारतभर केली त्यातील अनेक ठिकाणे त्यांनी दुरुस्त केली.  वर्तमानकाळात रयतेचे सुख पाहून याशिवाय  भविष्याची सोय यासाठी त्यांनी नियोजन केले होते. म्हणूनच आज तेथे एक बाजारपेठ, माहेश्वरी साड्या, घाटावरील मंदिर आणि किल्ल्याच्या रूपाने पर्यटन अस्तित्वात आहे. जगभरातून पर्यटक या छोट्या शहराला भेट देतात. 


नर्मदा आरती आणि भाविक भक्त 


धुळे इंदोर महामार्गावर धामणोद याठिकाणापासून फक्त १३ किलोमीटरवर महेश्वर आहे. रस्ता अतिशय निवांत आणि छान आहे. विंध्य आणि सातपुडा  पर्वतरांगांच्यामधे नर्मदा काठावर हे शहर वसलेले आहे.  जिलेबी, दूध, पुरी भाजी, सामोसा, पराठा, चाट आणि अजून बरेच काही खाण्यास येथे मिळते.  इथली हॉटेल्स हि विविध प्रकारचे जेवण देतात. त्यामुळे खवय्यांसाठी हि योग्य जागा आहे.  येथे जाण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू असतो . 


नर्मदा आरती आणि भाविक भक्त 


आम्ही नेमका तोच साधून पुण्याहून भल्यापहाटे निघालो. पोहोचे पर्यंत रात्रीचे साडेसात वाजले. हो रात्रीचे ! कारण तोपर्यंत अंधार पडला होता आणि  शहर छोटे असल्याने जवळपास शांत होते पण थोडीफार दुकाने चालू होती.  आम्हाला पाहायची होती नर्मदा आरती. जसे बनारसची गंगा आरती जगप्रसिद्ध आहे तशीच मा रेवाची आरती देखील. फरक फक्त एक आहे की  येथे गर्दी कमी असते असते आणि नदीपात्र अगदी नितळ स्वच्छ. शांत वातावरणात नदीत सोडलेले दिवे, नादमधुर आरती आणि मंत्रमुग्ध अवस्थेत असणारे भाविक. सर्व गोष्टी शब्दात आणि छायाचित्रात व्यक्त होऊ शकत नाही.  


मा रेवा आणि भावविभोर वातावरण 


त्यातीलच  हा  एक अनुभव. आमच्या सोबत आमचा परदेशी मित्र   Aaron   होता . त्याच्यासाठी तर हा अनुभव एक्दम नवीन आणि प्रसन्न होता.   आरतीत सहभागी झाल्यानंतर  बराच काळ तो घाटावर शांत बसून होता. मी देखील अनाघासोबत आरती नंतर लोक नदीतील माश्यांना कसे खाऊ घालतात ते पाहत होतो. नदीतील सजीवांना अन्नदान करण्याची परंपरा प्रत्येक धार्मिक  ठिकाणी आम्ही पाहिलीय. यामुळे एकप्रकारे आपण आपल्यावर इतर सजीवांच्या जबाबदारीची जाणीव असल्याचे जाणवते.  विशेषतः लहान मुलांना माशांची चुळबुळ  पाहायला जास्त मजा येते. उशीर झाला होता मग आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी ( हॉटेलमध्ये ) गेलो. डिसेंबर असल्याने वातावरणात थंडी खूपच होती. शिवाय नदीपात्र जवळच असल्याने येथे थोडी जास्तच.मित्रवर्य आनंदात 


दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच्या आम्ही परत घाटावर गेलो. रस्ता आदल्या रात्रीचाच पण प्रकाशात त्याची भव्यता आणि उत्कृष्ट शिल्पकाम पाहून असे वाटले कि आपण इतिहासकाळात तर गेलो नाही ना ? थंडी भरपूर असल्याकारणाने धुके बराच काळ होते. सूर्यनारायणाने काही आम्हाला ११ वाजेपर्यंत दर्शन दिले नाही. पण तिथे फक्त असण्याचा, लोकोत्सव पाहण्याचा अनुभव होता तो अजूनही मनाच्या कोपऱ्यात ताजा आहे. 
शांत - निवांत 


काही जागा तुमच्या मनाचा ठाव घेतात . त्यातलीच   ही एक जागा . घाटावर असताना त्याची भव्यता आणि सौंदर्य याच्या मधोमध आपण असतो . पण जेव्हा एखाद्या छोट्या होडीतून आपण घाटापासून दूर जातो तेव्हा त्याचे सौंदर्य अजूनच नयनरम्य भासते . जवळच नदीपात्रात एक मंदिर आहे. नावाडी तिकडे आपणास घेऊन जातो . शक्यतो डिझेल बोटने जाण्याऐवजी होडीने जावे . नदीतील पवित्र शांततेचा अनुभव निवांतपणे  घेता येतो. पैसे देखील कमी लागतात आणि जास्त वेळ नदीपात्रात फिरत येते.


थंडीतील नर्मदा स्नान 


जगभरात क्वचितच एखाद्या नदीची  परिक्रमा लोक करीत असतील. परंतु हजारो वर्षांपासून नर्मदा परिक्रमा भारतवर्षात रूढ आणि महत्वाची मानली जाते. असेदेखील म्हणतात की महाभारतातील  चिरंजीवी योद्धा अश्वत्थामा अजूनही नर्मदेच्या यात्रेकरुंपैकी एखाद्याला भेटतो.  लाखो यात्रेकरूंना आजपर्यंत हि खडतर परिक्रमा केली असेल. आणि यापरिक्रमा मार्गात घनदाट जंगले,अडीअडचणी आहेत. पण त्यासोबतच सुंदर गावे, शहरे देखील आहेत. ठिकठिकाणी मंदिर आणि घाट देखील बांधले आहेत. त्यात महाराणी अहिल्याबाईचा वाटा महत्वाचा. त्यातीलचएक महत्वाचा आणि सुंदर असाहामहेश्वरचा घाट . जगभरातून अनेक छायाचित्रकार, कलाकार , सिनेमा बनविणारे या जागेला भेट देतात. कदाचित कुठल्यातरी चित्र, छायाचित्र वा चित्रपटात तुम्ही हा घाट पहिला देखील असेल. महेश्वर घाट आणि किल्ला 


घाटावरील बांधकाम काळ्या दगडात केले आहे . अतिशय नाजूक नक्षी ते युद्ध प्रसंग, सैनिक, राजे, देवी देवता अशा अनेक  गोष्टी घाट आणि त्यावरील मंदिरावर पाहायला मिळतील. रोज सकाळ संध्याकाळ येथे स्थानिक येतात कोणी योगासन, ग्रंथवाचन, ध्यानधारण, कोणी नदीतील माश्यांना खाऊ घालतो, एखादा लोकांना अन्नदान करतो तर एखादा पूजाअर्चा करतो. मार्ग अनेक पण मनःशांती मात्र सर्वांनाच नक्की मिळते. मधेच एखादा नर्मदा परिक्रमेतील यात्रेकरू देखील दिसतो. हेतू वेगवेगळे, जाण्याच्या वाटा देखील निराळ्या. पण मनाच्या कोपऱ्यातील ही पवित्रता, नर्मदाकाठच्या आठवणी आयुष्यभरासाठी आपण घेऊन जातो . 

नर्मदा परिक्रमेतील एक वाटसरू 


जगद्गुरू शंकराचार्यानंतर महाराणी अहिल्याबाईनी भारतीय संस्कृतीचे एका वेगळ्या प्रकारे भारतात पुनर्जीवन केले. इतर ठिकाणी तुम्हाला मोठमोठे महाल दिसतील पण येथे मात्र सार्वजनिक जागा अतिशय भव्य, सुंदर  आणि राजमहाल अतिशय साधा. यातूनच त्यांच्या साधेपणाची कल्पना येऊ शकते. मौजमजा करण्यासाठी खुप साऱ्या जागा असतात . परंतु निसर्गाच्या सानिध्यात कुठलीही प्रवेश शुल्क न देता मन शांत करण्यासाठीच्या जागा मात्र आपल्या देशात मुबलक आहेत. आणि त्यामागे दूरदृष्टी आहे अहिल्याबाईची. भारतवर्षाच्या हृदयस्थानी उत्तर आणि दक्षिणेच्या मध्ये आजूबाजूला चोहोबाजूंनी पुरुष राजे असतानां एका स्त्रीने राज्य नुसते चालविणे नाही तर यशस्वीपणे वृद्धिंगत करणे यासाठी स्थिरचित्त, परोपकारी वृत्ती आणि वेळप्रसंगी कठोरता हे सर्व गुण ज्यांच्या अंगी होते अशा महाराणी अहिल्याबाई नगर जिल्ह्याच्या कन्या होत्या याचा अभिमान महाराष्ट्रातील आणि सर्व भारतवर्षातील मुलींना निश्चितच हवा. 

गावाकडील भक्त 


राजे अनेक येतात आणि जातात. अतिश्रीमंतही संपतात. कीर्ती देखील काही काळापुरती असते . परंतु मानवकल्याणासाठी दैवी स्पर्श झालेले विद्वान, राजे, क्रांतिकारी, कवी आणि कलाकार व्यक्तिमत्वच  काळाच्या पडद्यावर चिरंतन राहतात. कारण त्यांचे कार्य हे शरीर संपले तरीही त्यांच्या कृत्यातून, विचारांतून, आणि कलेतून आपल्या मध्ये वाहत असते. आणि आपल्याला अशाच व्यक्तींचा अभिमान असतो जे आपल्यातील सर्वोच्च गुणांना प्रेरित करून जागे करतात. 


मंदिरातील कोरीव नक्षीकाम 


आजही जर तुमच्या गावाबाहेर एखादे मंदिर, देवराई, नदीकाठीच घाट, डोंगर किंवा वनराई असेल तर तुम्हाला मन प्रसन्न करण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी विचारपूर्वक काहीतरी मागे सोडले आहे हे लक्षात ठेवा . आणि जर ते नसेल तर नवनिर्मितीची जबाबदारी कोणीतरी आपण घ्यायला हवी. आजही आत्ताच्या काळात आपण शिवाजी राजांना, शाहू महाराजांना, पेशवा बाजीरावांना, महात्मा फुले यांना आणि  टाटा उद्योगसमूहाला का मानतो याचे उत्तरही त्यातच दडले आहे.  निसर्ग, उत्तम गोष्टी, कलाकार यांचे संरक्षण, त्यांचा प्रसार वर्तमानात जगत असताना  पण भविष्यावर नजर ठेवूनच उत्तम शासक करतो. देशाटनातून आपण हेच तर शिकतो. कधी काळात ते कधी नकळत. तर चला मग आमच्यासोबत येत्या हिवाळ्यात भारत भ्रमंतीला ! 

   लय , ताल आणि भाव 


उपयुक्त माहिती :


धुळे ते महेश्वर : १९१ किमी 


इंदोर ते महेश्वर : ९६ किमी 

ओंकारेश्वर ते महेश्वर : ६५ किमी 


रेल्वे स्टेशन : बडवाह : ४९ किमी  / इंदोर ९६ किमी 

विमानतळ : इंदोर ९६ किमी 


जवळपासची ठिकाणे : मांडव ( मांडू ), इंदोर, ओंकारेश्वर, उज्जैन 


काय टाळावे : परत मागे येताना हायवेचाच वापर करावा. बुऱ्हाणपूर ते औरंगाबाद रास्ता आजघडीला अजूनही काम चालू आहे. नदीत जर स्नान करायचे असेल तर जिथे साखळदंड आहेत तिथपर्यंतच करावे. नदीपात्र खोल आहे आणि हिवाळ्यात पाणी खूपच थंड असते. 


शिकार 

खास खवैय्यांसाठी : इंदोरी पोहे , जिलेबी , शुद्ध तुपातील मिठाई , पराठा , उत्तर भारतीय खाद्य पदार्थ यांची रेलचेल . 

विशेषतः इंदोरच्या सराफ बाजारला भेट हि अवश्य द्यावी ती फक्त खाण्याकरिता . आणि हो दुपारी जेवण कमी करा म्हणजे पोटात जरा जागा राहील . जवळपास ५० प्रकारच्या मिठाया आणि खाद्य पदार्थ तुमच्यासाठीच. 


नक्षीकाम 


युद्ध दृश्य 
सोबत 


कॅफे झाडांमध्ये हरवलेला पराठा आणि काय हवे नाश्त्याला ! 

184 views
  • YouTube Social  Icon
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Flickr Social Icon
  • Instagram Social Icon

© Raginee Yogesh Kardile